वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती’ ह्या पुस्तकात डॉ. सुरेश सावंत यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालत असलेल्या चाकोरीबाहेरच्या उपक्रमांचा संशोधनपूर्वक आढावा घेतला आहे. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणप्रक्रियेतील महत्त्वाच्या आणि अलक्षित अशा दोन पैलूंकडे लक्ष वेधले आहे. शिक्षण हा डॉ. सावंत यांच्या निदिध्यासाचा विषय असल्यामुळे त्यांनी हे लेखन अतिशय समरसून, आत्मीयतेने आणि जिवीच्या जिव्हाळ्याने केले आहे.पारंपरिक अर्थाने ही बालसाहित्याची समीक्षा नसून ह्या पुस्तकात डॉ. सावंत यांनी बालसाहित्य आणि बालशिक्षण यांचा आंतरिक अनुबंध अधोरेखित केला आहे. त्यांनी अभ्यासपूर्वक नोंदविलेली निरीक्षणे ह्या दोन्ही क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरतील, अशीच आहेत.डॉ. सावंत हे सर्जनशील आणि आनंददायी शिक्षणाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपल्या तीन तपांच्या शैक्षणिक कारकिर्दीत जे अभिनव उपक्रम कार्यान्वित केले, तेच ह्या पुस्तकाचे भक्कम अधिष्ठान असल्यामुळे ‘आधी केले, मग सांगितले’ असे ह्या लेखनाचे प्रेरणादायी स्वरूप आहे.वाचनसंस्कृती आणि लेखनसंस्कृतीच्या विकासासाठी धडपडणाऱ्या सेवाव्रती शिक्षकांच्या प्रयत्नांना बळ देणारे आणि शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारे हे पुस्तक मृतप्राय होत चाललेल्या शिक्षणप्रक्रियेत प्राण फुंकण्यासाठी संजीवक ठरेल, असा विश्वास वाटतो.