कधी अपेक्षेइतके पाहुणे येत नाहीत, कधी कुणाची भूकच मंदावते, तर कधी घरातील मंडळींचा अचानक बाहेर खायला जाण्याचा बेत ठरतो. अशा वेळी स्वयंपाक तोलूनमापून करूनही काही पदार्थ उरतात. हे पदार्थ दुसर्या दिवशी खायला मंडळी नाखूष असतात आणि ते टाकून देण्याचा विचार मनात येऊ नये, हेही खरेच! पण त्यामुळे पेच कायम राहतो— करायचं काय या शिल्लक पदार्थांचं? मृणाल चांदवडकर या स्वयंपाकात विशेष रुची असलेल्या अनुभवी गृहिणी. त्यांनी गेली काही वर्षें अशा उरलेल्या पदार्थांवर अनेक प्रयोग केले आणि विविध प्रकारच्या उरलेल्या पदार्थांतून नव्याने करता येण्याजोगे पदार्थ कोणते हे शोधले. त्यांची कृती पध्दतशीरपणे लिहून काढली, उरलेल्या पदार्थांच्या उपयोगाचे कल्पकतेने विविध पर्याय तयार केले. हे पर्याय म्हणजेच हे पुस्तक होय! सर्वच गृहिणींना ते वरदान ठरावे.