व्यक्तीची वाणी आणि कर्तृत्व यामुळे त्या व्यक्ती चिरकाल आपल्या स्मृतीत राहतात. आपल्या भाषणांनी जनसामान्यांना प्रेरित करण्याची क्षमता सर्वच वक्त्यांमध्ये असतेच असे नाही. ज्या महान विभूतींमध्ये ही क्षमता होती, त्यांच्या भाषणांचे संकलन म्हणजेच ‘विश्वातील महान भाषणे’ हे पुस्तक.या पुस्तकाद्वारे आजच्या सुज्ञ वाचकांना हे सत्य जाणवेल की, इतिहासात कधी मोठ्यातला मोठा त्याग करून सत्य प्रकट करणारे निष्णात, साहसी व्यक्तिमत्त्व होते; तसेच थकल्याभागल्या लोकांच्या हृदयात विद्रोहाचे निखारे भडकविणारेही होते. आपल्या थोड्याशा शब्दांनी राष्ट्राच्या कठीण प्रसंगी प्राणांची बाजी लावण्याची प्रेरणा देणारेही होते.अब्राहम लिंकन, अल्बर्ट आइनस्टाइन, गॅलिलिओ गॅलिली, जॉन एफ. केनेडी, नेल्सन मंडेला, बराक ओबामा, मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर यासारख्या पाश्चात्त्य; तसेच महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस, ए.पी.जे. अब्दुल कलाम यासारख्या भारतीय विभूतींच्या विचारांमध्ये एक साम्य होते. ते म्हणजे विविध राष्ट्र, समाजातील सर्व भागांची चिंता आणि अशा राष्ट्रांच्या, समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्यातील तळमळ, काळाच्या पडद्याआड गेलेल्या यातील काही व्यक्ती त्यांच्या प्रेरक विचारांमुळे आजही जिवंतच आहेत, हेदेखील एक निर्विवाद सत्यच. या सर्वांनीच दिलेला हा शांतीचा संदेश आपल्यासाठी सादर.