आजचा काळ अनेक प्रश्नांचा, स्थित्यंतरांचा, अस्थिर नि अशांत असा आहे. जागतिकीकरणा पाठोपाठ आता डिजिटल क्रांतीचे पडसाद उमटू लागले आहेत. व्यक्तिकेंद्रीपण, चंगळवाद, ताणतणाव, प्रचंड एकटेपण, माणसामाणसांतील बंध, नाती यांच्यात येत गेलेले विसविशीतपण, जगण्याचा खरा अर्थ विसरायला लावणारी जीवनशैली हे सर्व स्वीकारताना आपण जगण्यातील उत्कटता, अस्सलता हरवत चाललो आहोत. कीर्ती मुळीक यांनी ही स्पंदनं ‘वर्तमान’ कथासंग्रहातून टिपली आहेत. त्यांच्या कथांमधून सूचित होणारं हे वास्तव गडद आहे.
ही लेखिका प्रतिकात्मकरीत्या कथेचे केंद्र उलगडत नेते; ज्यातून या लेखिकेचे चिंतन व्यक्त होते. प्रत्येक कथा केंद्राभोवती एकवटत स्वत:चा प्रवास पूर्ण करते. त्यामुळे कथेचा परिणाम वाचकांच्या मनावर दीर्घकाळ उमटून राहतो.- मोनिका गजेंद्रगडकर