साररूप समग्र व. दि. कुलकर्णी - भाग – २
प्रा. डॉ. व. दि. कुलकर्णी हे साहित्याचे अभ्यासक, वाङ्मयाचे आस्वादक आणि संतसारस्वताचे उपासक होते. शांतपणाने व संयमाने पण निश्चित मते मांडण्याची त्यांची पद्धत होती. विषयाच्या अंतरंगात खोलवर उतरण्याची त्यांना सवय होती; आणि डोळस श्रद्धेने विवेचन करत शांतरसाचा आस्वाद घेणे व रसिकांना देणे ही त्यांची वृत्ती होती.
प्रा. डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्या जवळ जवळ सर्व ग्रंथाचा साररूपात परिचय करून देणारे डॉ. जयंत वष्ट यांचे ‘‘साहित्यविमर्शक आणि वाङ्मयास्वादक व. दि.’’ आणि ‘‘व. दि. आणि संतसारस्वत’’ हे दोन ग्रंथ जणू वदिवाङ्मयाचे प्रस्तावना खंडच आहेत. अशा प्रकारे एखाद्या समीक्षकाचा समग्र साररूप परिचय करून देणारा हा बहुधा पहिलाच योग असावा. वदिंच्या श्रोत्यांना-वाचकांना आणि ‘मराठी’च्या अभ्यासकांसह रसिकांनाही हे एक अभ्यास-साधनग्रंथ ठरतील आणि ते त्यांच्या मूळ ग्रंथांकडे आकृष्ट होतील असे वाटते.