उर्दू शायर आणि शायरी यांच्याबद्दल १९६५ ते २०१५ एवढ्या प्रदीर्घ काळात मी लिहीत आलो आहे. यातील मासिक-वार्षिकातील लेख जतन करून ठेवले होते. त्यापैकी निवडक आणि प्रातिनिधिक लेखांचा हा संग्रह मराठी रसिक वाचकांना पेश करीत आहे. विशेषतः महाविद्यालयीन तरुण- तरुणींनी माझ्या भाषणातून उत्स्फूर्तपणे येणारे चपखल शेर ऐकल्यावर आणि उर्दू शायरीबद्दल मी लिहिलेल्या लेखांपैकी काही लेख वाचल्यावर, मी हे संग्रहाच्या रुपात प्रसिद्ध करावेत असे सुचविले. या तरुण मित्रांकडून मिळालेली प्रेरणा प्रस्तुत प्रकाशनाला आधारभूत ठरली आहे. उर्दू शायरीवरील चिकित्सक प्रबंध म्हणून कृपया याकडे पाहू नये. हा नावाजलेल्या शायरांच्या भावगीतिकांमधील विविध रस आणि रंग यांचा आस्वादक परिचय आहे.