कर्नाटक राज्यातील बंट समाजातील तीन पिढ्यांची कथा सांगणारी ही कादंबरी एका मातृसत्ताक कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकते. हा समाज शेतीप्रधान असून, स्वातंत्र्योत्तर काळात बदलत्या कायद्यांमुळे समाजावर झालेल्या परिणामाचे जिवंत व ज्वलंत चित्रण कादंबरीमध्ये ना. मोगसाले या लेखकाने अतिशय मार्मिकपणे केले आहे. मूळ कन्नड भाषेत; परंतु आता मराठीत अनुवादित असलेली ही कादंबरी समाजशास्त्रातील परिकल्पनांना एक वेगळेच परिमाण प्राप्त करून देते. मातृसत्ताक समाजव्यवस्था भू-सुधारणा कायद्यामुळे कशी प्रतिक्रिया देते आणि आपलं अस्तित्व राखण्यासाठी कशी धडपडते, हा ऐतिहासिक पदर या कादंबरीला लाभला असून सर्जनशीलता, समाजशास्त्र आणि इतिहासाचे काही अंश एकत्र येऊन ही कादंबरी ‘देशी’ पण दाखवून देण्यात यशस्वी झाली आहे.