'तुकोबांची गाथा म्हणजे मराठी सारस्वताचे वैभव. तुकोबांचे संतत्व, त्यांचा रोकडा उपदेश, काळाच्या कसोटीवर उतरलेले त्यांचे अभंग, रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असे त्यांचे जीवन या सा-यांचे तीन शतकांहून अधिक काळ मराठी मनावर गारूड आहे. तुकोबांच्या उक्ती म्हणजे जणू मराठी भाषेची अंगभूत कवचकुंडले. आपल्याला अद्वितीय वाटणा-या तुकोबांच्या साहित्याला आधुनिक साहित्यशास्त्राच्या कसोटया लावल्या तर? डॉ. दिलीप धोंडगे यांनी हाच प्रयत्न केला. शैलीविज्ञान या महत्त्वपूर्ण आधुनिक ज्ञानशाखेच्या निकषांवर तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध घेतला. डॉ.रा.गो.भांडारकर, पु.मं.लाड, वा.सी.बेंद्रे, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, म.सु.पाटील, किशोर सानप अशा मान्यवर अभ्यासकांच्या तुकोबांविषयीच्या विवेचनात मोलाची भर टाकणारा आगळावेगळा ग्रंथ तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा '