यशोधराची कथा रूढ असलेल्या कालक्रमनिष्ठ पद्धतीने अवतरत नाही. ती अवतरते आत्माविष्काराच्या आत्ममग्न टवटवीत शैलीत. तिचा हा आविष्कार त्या त्या वेळी घडणाऱ्या आणि स्वाभाविक वाटणाऱ्या लहानमोठ्या घटना-प्रसंगांतून पुढे सरकत असतो. कथेतील दोन पात्रे एकमेकांना सहज भेटतात किंवा सामोरी येतात आणि त्यांच्यात संवाद सुरू होतो. त्या पात्रांचा मागचापुढचा संदर्भ लेखिका तिथल्या तिथे देत नाही. त्यामुळे पात्रांच्या नात्याला वाचकांच्या दृष्टीने धूसरता प्राप्त होते. त्यांची कथा वाचकाला आरंभापासूनच खिळवून ठेवते. त्यातूनच वाचकाची जिज्ञासा वाढत जाते आणि ती कथा पूर्ण वाचायची ओढच त्याला लागते.