‘द वेस्ट लँड’ ही इलियट यांची साहित्यविश्वात गाजलेली कविता. ह्या कवितेला महायुद्धाच्या भीषण परिणामाची पार्श्वभूमी आहे. ह्या दीर्घ कवितेने काव्याच्या जगात मोठी खळबळ माजवली. जगातल्या अनेक भाषांत तिचा अनुवाद झाला. ‘द वेस्ट लँड’ ही मानवाने आपल्याच जातीच्या केलेल्या हिंस्र संहाराची कविता आहे. काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा उत्कट संगम या कवितेत झाला आहे.
इलियट यांचा दृष्टिकोन सुरुवातीला निराशावादी असला तरी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाच्या संगमामुळे मानवतेच्या पुनरुज्जीवनाची आशा ही कविता निश्चितच व्यक्त करते.
‘फोर क्वार्टेटस्’ हा टी. एस. इलियट यांच्या चार कवितांचा एकात्म गुच्छ आहे. कवितांच्या या चौफुल्याला इलियट यांनी ‘फोर क्वार्टेटस्’ हे नाव दिले आहे. या कवितेत हे चार घटक प्रतीकात्मक आहेत : अनुभूती, कविता, तत्त्वज्ञान, धर्म असे हे चार घटक आहेत. या चार स्वतंत्र कवितांना एकात्म जोडणारे निर्मितीचे सूत्र आहे. जीवनचैतन्याचे अनंत अस्तित्व आणि त्याबरोबरच मानवी इतिहासाची गुंतागुंत यांचे संवेदनशील चिंतन या कवितेत आहे.
प्रा. देशमुख यांनी केलेेले या दोन कवितांचे भाषांतर आणि विश्लेषण त्यांच्या काव्यात्म चिंतनशीलतेची साक्ष देणारे आहे.
- मंगेश पाडगांवकर