ही गोष्ट आहे रुख्साना नावाच्या तरुण पत्रकार मुलीची. ती काबूलमध्ये राहते. घरी कॅन्सरने आजारी म्हातारी आई आणि जहान नावाचा लहान भाऊ. तिचे आजोबा आणि वडील तालिबानने पेरलेल्या एका भूसुरुंगाच्या स्फोटात मारले गेलेले आहेत. या रुख्सानाला आपली नोकरी तालिबानच्या दादागिरीमुळे सोडावी लागली आहे. कारण ‘स्त्रिया फक्त दोनच ठिकाणी असाव्यात- घर किंवा कबर,’ असं तालिबानचं मत आहे. स्त्रियांना एकटं घराबाहेर पडण्याची मुभा नाही. घरातली पुरुष व्यक्ती सोबत असायलाच हवी; नाहीतर फटके किंवा मृत्युदंड. अशा परिस्थितीत तालिबानचा कमांडर झोराक वाहिदी घोषणा करतो अफगाणिस्तानात क्रिकेट सामने भरवण्याची. अर्थातच फक्त पुरुषांसाठी. यात जिंकणारी टीम पुढच्या कोचिंगसाठी पाकिस्तानात जाणार आणि जगभरात अफगाणिस्तानाचं नेतृत्व करणार. रुख्साना दिल्लीच्या वास्तव्यात टीमसाठी क्रिकेट खेळलेली आहे़ आता ती जबाबदारी घेते आपल्या भावंडांना क्रिकेट शिकवण्याची. तालिबानच्या राज्यात रुख्साना त्यात यशस्वी होते का, क्रिकेटच्या माध्यमातून अफगाणिस्तानातून सुटका करून घेण्याची संधी तिला आणि तिच्या भावंडांना मिळते का, हे जाणून घेण्यासाठी ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ वाचलंच पाहिजे.