मानवी जीवन, कथात्म साहित्याच्या एका आधुनिक सिद्धांतानुसार, जर घड्याळाच्या काट्याच्या टिक म्हणजे ‘प्रारंभ’ आणि टॉक म्हणजे ‘अंत’ या दरम्यानच फक्त घडत असेल,
तर मग फ्रेंच विचारवंत लेखक आल्बेर काम्यूच्या “जीवनाचा खरा तात्त्विक प्रश्न म्हणजे आत्महत्या होय,” या विधानाचा काय अर्थ असेल?
कदाचित काम्यूचे म्हणणे पटल्यामुळे केंब्रिज विद्यापीठातील एक तरुण बुद्धिमान तत्त्वज्ञ या कादंबरीत आत्महत्या करतो आणि त्यामुळे काळाच्या ओघात चार व्यक्तींच्या आयुष्यांना वेगळे पण अनाकलनीय अर्थ प्राप्त होतात.
अशा ‘एका अंताचा अन्वयार्थ’ लावीत पुढे जाताना ही कादंबरी काळ, स्मृती, इतिहास आणि नियती यांचे नवीन विश्लेषण समोर मांडते. जर कालप्रवाहाबरोबर स्मृतीही बदलत असेल
तर इतिहासाची व्याख्या अशीही होऊ शकते :
“जेथे स्मृतींची अपूर्णता आणि पुराव्याचा अपुरेपणा मिळतो तेथे इतिहास लिहिला जातो.”
मानवी मनाच्या वैचारिक जाणिवा-नेणिवा इतक्या गुंतागुंतीच्या असतात की, जीवनाच्या शोकांतिकेचा अर्थ लावताना अखेर उरते फक्त संदिग्धता. खर्या अर्थाने
एकविसाव्या शतकाचे प्रातिनिधिक चित्रण करणारी ही ‘मॅन बुकर’ विजेती कादंबरी मराठी रसिक वाचकांनी वाचायलाच हवी.