‘द ग्रेट गॅटस्बी’ ह्या फिटझेरल्डच्या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित चित्रपट हॉलिवुडमध्ये नुकताच प्रदर्शित झाला असून ‘अमिताभ बच्चन’यांची त्यात भूमिका आहे. ‘द ग्रेट गॅटस्बी’ ही फिटझेरल्डची अप्रतिम व सर्वश्रेष्ठ कादंबरी मानली जाते. ‘जॅझ-युग’ या नावाने ओळखल्या जाणार्या गेल्या शतकाच्या प्रारंभीच्या काही दशकांची प्रातिनिधिक कादंबरी म्हणूनही तिला आगळे महत्त्व आहे; तथापि त्या काळातील व्यक्तिमनाची व समाजाची भ्रांत अवस्था, स्वप्ने व वास्तव यांचे विदारक दर्शन आणि फिटझेरल्डची विलक्षण संवेदनक्षमता, प्रतिभा आणि अवर्णनीय भावकाव्यात्मता यांकरताच ती अधिक महत्त्वाची आहे. जे गॅटस्बी ह्या अत्यंत धनाढ्य, कर्तृत्ववान, शूर पण हळव्या मनाच्या तरुणाची ही शोकात्म प्रेमकहाणी आहे. पराकोटीचे नि:स्वार्थ प्रेम आणि निष्ठा ह्या मानवी सद्गुणांबरोबरच आत्यंतिक स्वार्थ, क्रौर्य, अज्ञान, वासना आणि अनाकलनीय नियतीचे प्रहार यांचेही मन बधिर करून टाकणारे दर्शन ह्या कहाणीत घडते. कथा-निवेदन व बांधणीच्या दृष्टीनेही कादंबरी अतिशय कलात्मक आहे. विसाव्या शतकातील कादंबरी-वाङ्मयातील सर्वांत उल्लेखनीय व अभिजात कादंबर्यांपैकी एक म्हणून ‘द ग्रेट गॅटस्बी’रसिकमान्य आहे.