लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या 'द ग्रेप्स ऑफ रॉथ' या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे.भांडवलकेंद्री मोठ्या शेतीच्या धोरणाच्या पुरस्कारार्थ मध्य अमेरिकेतील लाखो लहान-मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवरुन हुसकावून लावलं गेलं... पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कापसाच्या, द्राक्ष-संत्र्याच्या बगिच्यांमध्ये काम मिळेल, या आशेने या विस्थापित कुटुंबांनी दोन हजार मैलांचा खडतर प्रवास करून केलेलं स्थलांतर... त्या प्रक्रियेत वाट्याला आलेलं दैन्य, निर्वासित छावण्यांमधील भीषण अमानवी जीवन आणि उद्धवस्थता...आणि याच प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जाणिवेत घडून आलेले सूक्ष्म बदल आणि आत्मिक क्षोभाची भावना... एक विशाल बहुपेडी पट उलगडून दर्शविणारी हि एक हृदयस्पर्शी कादंबरी.
सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्टयांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा 'साहित्य अकादमी' पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद.
लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी 'द ग्रेप्स ऑफ रॉथ'.