पृथ्वीच्या गर्भातून उमटणारे साद-प्रतिसाद, ध्वनी-प्रतिध्वनी, अश्रू आणि हुंदके हे ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ चे प्राणतत्त्व ! मानवी अस्तित्वाला घेरून असणारी आदिम भीती आणि नियतीच्या पाशामधली अपरिहार्यता यांचे वेढे उलगडून पाहणा-या या अद्वितीय लेखनाला अदृश्य मानसिक ताणाचे अस्तर आहे. अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, तीव्र तिरस्कार, अपराधीपणाचा डंख अशा अनेक भावभावनांचे पदर कोळ्यांच्या जाळ्यासारखे धावत राहतात... विणले जातात... त्या जाळ्यांच्या वेढ्यांमधून सुटता येत नाही. स्वत:ला अलग करता येत नाही. लोणच्यामध्ये खारवलेल्या आंब्यांचा, जॅममधल्या पिकल्या केळ्यांचा वास येत राहातो. मामाच्या गाडीत बसून एका अपरिहार्य शोकांतिकेकडे प्रवास करणा-या मुलांची गाणी ऐकू येतात. कथानकाच्या शब्दाशब्दातून ठिबकणारा शोक, गूढ रहस्य आणि काळीज हलवून टाकणारी खिन्नता हे सारेच एक अजब चेटूक आहे. जाणिवांना संमोहन घालणारा प्रारंभ वाचतानाच लक्षात येते, की नवीन काहीतरी सांगणा-या एका ताज्यातवान्या प्रतिभेने आपल्या मनाची पकड घेतली आहे.. श्वास रोखून धरायला लावणारा नवा स्वर! यानंतर अशी कथा जणू पुन्हा सांगितलीच जाणार नाही. हीच पहिली... आणि एकमेव ! (आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या ‘बुकर पुरस्कार’ विजेत्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ला मिळालेल्या जागतिक अभिप्रायांमधून)