प्रत्येक बारा भारतीय तरुणांतील एका तरुणासाठी अर्थपूर्ण शिक्षणाला निर्णायक महत्त्व आहे. उत्तम दर्जेदार शिक्षणामुळे आमच्या तरुणांना नोकरी मिळणे सुलभ होईल आणि आपली कारकीर्द उभारता येईल, इतकंच नव्हे तर अशा शिक्षणामुळे आपल्या सर्वांच्या सामूहिक विचारकक्षा आणि कल्पनाशक्ती रुंदावतील; अशा अनेक कारणांसाठी आज आपणा सर्वांनी या विषयाला अनन्य महत्त्व द्यायलाच हवे.
पण दुर्दैवाने असं होताना दिसत नाही. आज शैक्षणिक संस्था आणि त्यातील विभाग आणि त्यात कार्यरत माणसांसाठी संसाधनांचा अभाव, आर्थिक तरतुदीचा अभाव आणि खऱ्या स्वायत्ततेचा अभाव आहे. पण एवढेच नाही. आज वेगाने आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या देशाला कोणते ज्ञान सर्वांत समर्पक आहे, हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे.
लेखकाचे असे आग्रहाचे म्हणणे आहे की ज्ञान हा शिक्षणाचा आत्मा असेल; शिक्षण हा देशाचा मूलाधार असेल तर देशातील शैक्षणिक संस्थांची दुरवस्था आणि भारतासाठी सुयोग्य ज्ञाननिर्मिती या दोन समस्या तातडीने सोडवायला हव्यात.
भूतकाळात घडलेल्या आणि आजही देशातील ज्ञान आणि शिक्षणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या गंभीर चुकांविषयी सुस्पष्ट चित्रे उभे करणारे अत्यंत मूलगामी आणि सखोल विश्लेषण.