डॉ. छाया महाजन हे नाव मराठी साहित्यविश्वात सर्वपरिचित आहे. इंग्रजीच्या प्राध्यापिका आणि एका नामवंत कॉलेजच्या प्राचार्या या अनुभवांतूनच तर ‘हरझॉग’ ही अनुवादित कादंबरी व ‘कॉलेज’ ही स्वतंत्र कादंबरी या साहित्यकृती अवतीर्ण झाल्या आहेत. ‘तन अंधारे’ ही कादंबरी आहे गोव्याच्या निसर्गरम्य व मुक्त वातावरणात विहरणार्या तीन पात्रांची : किरण, सॅम आणि मृदुल. किरण गरीब, लावण्यमयी; पण निसर्गत:च निम्फोमॅनिऍक. किरणच्या या अतिकामवासनेचा सवंग साधन म्हणून लेखिकेने कुठेही वापर केलेला नाही, उलट संयम, सूचकता व काव्यात्मता या गुणांनी तिने कादंबरीला अलंकृत व सुसंस्कृत केले आहे.