राजाश्रय आणि लोकाश्रय लाभलेल्या आणि मराठी मनांत खोलवर रुजलेल्या तमाशाकलेला लोकजीवनातून वगळता येणे शक्य नाही. तसेच तमाशाचा अविभाज्य भाग आहे ‘सोंगाड्या’. विनोदबुद्धी व हजरजबाबीपणा यांमुळे तमाशारसिकांना मनमुराद हसवून बहुजन समाजाचे सांस्कृतिक स्वास्थ्य यथाशक्ती संतुलित ठेवणार्या तमाशातील सोंगाड्या या पात्राविषयी या पुस्तकात सांगोपांग चर्चा करण्यात आलेली आहे. सत्यशोधक आणि आंबेडकरी जलशांतूनही सोंगाड्याच्या चतुर, मिश्कील आणि मार्मिक विनोदाचा वापर केल्याने असे जलसे लोकप्रिय झाले. परिवर्तनाच्या सांस्कृतिक चळवळीत जलशातील सोंगाड्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महाराष्ट्रातल्या कितीतरी सोंगाड्यांनी आपल्या कलाकर्तृत्वाने तमाशाकलेच्या गौरवात मोलाची भर घातली असूनही, हे महत्त्वाचे पात्र तुलनात्मकदृष्ट्या उपेक्षितच राहिलेले आहे. भि. शि. शिंदे यांनी प्रस्तुत पुस्तकात तमाशाकलेचा उद्गम, विकास, तमाशातील मूळ घटक, सोंगाड्या या पात्राची व्युत्पत्ती आणि सोंगाड्याचे आधुनिक रूप या सर्व घटकांचा ससंदर्भ आढावा घेतलेला आहे