या पूर्वी कधीही, कोणालाही ठोठावण्यात न आलेली दोन जन्मठेपींची म्हणजे पन्नास वर्षांच्या कारावासाची शिक्षा खांद्यावर खेळवत सावरकर उद्गारले, "आपली प्रिय मातृभूमी अंतिम विजयापर्यंत पोहोचायची असेल तर आम्ही अशा हालअपेष्टा आणि असे त्याग सहन केले तरच ती पोहोचू शकेल अशी माझी श्रध्दा आहे." हा सारा कालखंड त्यांना अंदमानच्या अंधारकोठडीत व्यतीत करायचा होता. मातृभूमीपासून दूर जाताना या स्वातंत्र्यवीराने तिला अभिवचन दिले: ‘ सारथी जिचा अभिमानी, कृष्णजी अणी राम सेनानी । अशी तीस कोटि तव सेना । ती अम्हाविना थांबेना । परि करुनि दुष्टदलदलना । रोविलच स्वकरी स्वातंत्र्याचा हिमालयावरि झेंडा जरतारी ॥’ त्या अदम्य आत्मविश्र्वासाची ही तेजोगर्भ चरितकहाणी.