असे काही.... लहानपणापासून पुस्तकांत कुठे काही लक्षणीय, चित्तवेधक, सुंदर आढळले, तर ते मी जवळ लिहून ठेवत असे. बालवय गेले, पण तो छंद सुटला नाही. उलट मोठेपणी मराठीच्या जोडीने इंग्रजी, संस्कृत या भाषांशीही निकट परिचय झाला, तेव्हा तर अशा उक्तींचे समृद्ध भांडारच हाती गवसल्यासारखे वाटले. इंग्रजी, संस्कृत कवितांचे अनुवाद करून त्यांचाही मी माझ्या संग्रहात समावेश केला — उदाहरणार्थ : राष्ट्राची श्रेष्ठता तुमच्या राष्ट्रात किती मोटारी आहेत, किती टोलेजंग इमारती आहेत, यावर तुमचे राष्ट्र मोठे ठरत नाही. तुमच्या राष्ट्रात चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अशा नागरिकांची संख्या किती आहे ते मला सांगा, म्हणजे मी तुमचे राष्ट्र किती श्रेष्ठ आहे ते सांगू शकेन! — मार्टिन ल्यूथर किंग निवडक उतारे, वचने, सुभाषिते, कवितापंक्ती, मार्मिक विनोद–जे जे जसे मला आवडत गेले, ते मी या संकलनात घेत राहिले. माझ्या दृष्टीने हे मुद्रित शब्दधन म्हणजे सुवर्णमुद्राच आहेत. ते समृद्ध भांडार माझ्याप्रमाणे वाचकांनाही रंजक, कुतूहलजनक, उद्बोधक वाटेल, अशी मी आशा करते...