चमत्कार हा शब्द उच्चारला की, आधुनिक मन जरा दचकतं. त्यामध्ये कुठेतरी दैवी शक्तीचा वास येतो. 'सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार' मधल्या चमत्काराला मात्र अंधश्रद्धेचा वास येण्याचं कारण नाही. कारण सूर्यमालेतील चमत्कार वैज्ञानिक आहेत. विज्ञानाच्या नियमांनी त्यांचं गूढ उकलता येतं. या अफाट विश्वातील एकमेवाद्वितीय सूर्यमाला हेच मुळी एक महान आश्चर्य आहे. याचं कारण सूर्यमालेतील पृथ्वीचं अस्तित्व आणि पृथ्वीवरील बुद्धिमान मानवाचा संचार. ग्रह-उपग्रहांचं भ्रमण, त्यांचे छोटे-मोठे आकार, त्यांची खास व्यक्तिवैशिष्ट्यं, धूमकेतू आणि लघुग्रह यांची नवलाई आणि अब्जावधी वर्षांपूर्वींच्या घडामोडी... या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे आपल्या सूर्यमालेतील मंत्रमुग्ध करणारे सृष्टिचमत्कार. कल्पनाही करता येणार नाहीत, अशा मती गुंग करणा-या गोष्टी इथं दररोज घडतात. या भव्य-दिव्य घटनांचा रंजक आलेख म्हणजे सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार