प्रत्येकाला कोणतातरी छंद असणं आवश्यक असतं. छंदातून आपल्याला आनंद मिळतो. - आणि हा आनंदच सदैव प्रेरणा देत असतो. बागकामाचा छंद असाच आहे. आपण राहता त्या बंगल्याभोवतालची किंवा सोसायटीमध्ये मोकळी जमीन असेल, तर बाग नक्की करा. आजकालच्या धावपळीच्या आणि भेसळीच्या जीवनात एखादी वस्तू शुद्ध स्वरूपात मिळणं फार अवघड झालं आहे. आपण आपल्या परिसरात भाजीपाला आणि फळझाडांची जोपासना केली, तर वस्तू आणि निर्भेळ आनंद मिळविता येईल. तसंच, असा भाजीपाला आणि फळ ताजी-ताजी खाल्ल्यानं त्यातील जास्तीत जास्त जीवनसत्वं आणि प्रथिनंही शरीराच्या आरोग्याला अधिक पोषक ठरतील. बागकाम केल्यावर आपला रिकामा वेळ तर सत्कारणी लागतोच. शिवाय त्यातून काही प्रमाणात आपण निसर्गाशी जवळीक साधतो आणि त्यातून निर्मितीचा आनंद मिळतो.