सुविचार’ म्हटल्यानंतर संस्कृत भाषेपुरतेच क्षेत्र मर्यादित करणे योग्य झाले नसते. ‘माझा मराठाचि बोलु कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके’ असे सार्थ अभिमानाने म्हणणारे ज्ञानेश्वर त्याचप्रमाणे भागवत धर्माचा कळस मानला गेलेला, मराठी भाषेचा जन-कवी तुकाराम, पौरुषाचे स्त्रोत असणारे समर्थ रामदास, यांसारख्या संत कवींच्या वेचक सुवचनांबरोबर मोरोपंत, वामन पंडित, यांसारख्या पंत कवींच्या सूक्तीही या छोटेखानी पुस्तकात आढळतील. संस्कृत वाडमयाचीच नव्हे तर मराठी सारस्वतातील निवडक सुवचनांची गंगा ही सर्वसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा संग्रह सादर केलेला आहे.