एका मध्यमवर्गीय कुटुंबातील विजया लवाटे यांनी एका व्रतस्थ व प्रसिद्धीविन्मुख वृत्तीने समाजसेवा केली. ती करताना त्यांना ज्या अग्निदिव्यांना सामोरे जावे लागले, त्याची प्रचिती ह्या पुस्तकातून येते. समाजाचा एक अंधार कोपरा वेश्यावस्ती - त्या कोपर्यात त्यांनी हा मानव्याचा दीप प्रज्वलित करून आपल्या कार्यास प्रारंभ केला. अशा कलंकित समाजव्यवस्थेविषयी आयल्या मनात करुणा असते परंतु प्रत्यक्ष कार्य करणे अवघड असते. समाजव्यवस्थेने नाकारलेल्या ह्या पीडित व प्रतिष्ठाहीन महिला, त्यांची मुले व कुटुंब ह्यांविषयी विजयाताईंच्या मनात अपार करुणा होती. त्या करुणेला त्यांनी प्रत्यक्ष सेवेची जोड दिली. ‘वेश्यावस्ती’ ते ‘मानव्य’ असा त्यांचा हा समाजकार्याचा प्रवास आहे. वेश्यांचे आरोग्य, कुटुंबनियोजन, त्यांच्या मुलांचे शिक्षण व मुलांवर सुसंस्कार यांसाठी शाळा, ‘वंचित विकास’चे कार्य आणि नंतर एड्सग्रस्त मुलांसाठी ‘मानव्य’ ही संस्था असा विजयाताईंच्या कार्याचा प्रचंड व्याप आहे. त्यांचा ह्या कार्याचा परिचय ‘स्पर्श मानव्याचा’ या आत्मचरित्रातून होतो. समकालीन समाजव्यवस्थेचे एक भयंकर चित्रण त्यातून प्रक. होत असल्याने तो एक काळाकुट्ट असा सामाजिक दस्तऐवज आहे. स्वभावाने शांत व सोशीक असलेल्या विजयाताईंचा हा आत्मप्रवास धगधगता असून तो वाचकांना अंतर्मुख करणारा आहे.