स्मृतिभ्रंशानंतर’ हा डॉ. गणेश देवी यांच्या ‘आफ्टर अॅम्नेशिया’ या ग्रंथाचा अनुवाद आहे. या ग्रंथाचे उपशीर्षक ‘भारतीय साहित्यसमीक्षेची परंपरा आणि तिच्यातील परिवर्तन’ असे आहे, डॉ. देवी यांच्या या ग्रंथाला 1993चे साहित्य अकादमीचे इंग्रजी साहित्याला दिले जाणारे पारितोषिक मिळालेले आहे. देशीवाद्यांमध्ये हे पुस्तक म्हणजे देशीवादाचा एक अधिकृत दस्तऐवज म्हणून मानला जातो.
भारतातील साहित्य-समीक्षेत आज पेचप्रसंग निर्माण झाला आहे, तो ज्यामुळे निर्माण झाला आहे त्याला येथे ‘सांस्कृतिक स्मृतिभ्रंश’ असे म्हटले आहे. त्याची चर्चा करताना डॉ. देवी यांनी त्यांना अवगत असणार्या मराठी, गुजराथी या भाषांवर व क्वचित ठिकाणी इंग्रजी समीक्षेवर अवलंबून राहणे पसंत केले आहे. या पुस्तकाचा विषय मात्र भाषा-समीक्षा हाच प्रामुख्याने आहे. मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांनी ह्या पुस्तकाचा अनुवाद करतानाच प्रदीर्घ प्रस्तावनेच्या साहाय्याने काही वाङ्मयीन चर्चाही केली आहे.