श्रीपर्वत हे आंध्रातले मल्लिकार्जुन शिवाचे प्रसिद्ध उपासनाकेंद्र आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे स्थान जवळजवळ दीड हजार वर्षे भारतातल्या शिवभक्तांचे एक महान साधनाकेंद्र म्हणून गाजत आले आहे. बौद्धांच्या मंत्रयान आणि वज्रयान पंथांची ती जन्मभूमी. शैव आणि शाक्त तांत्रिकांची प्रख्यात कर्मभूमी. पारंपरिक ग्रंथांतून उल्लेखलेले हे नाथपंथाचे उदयस्थान. महाराष्ट्राशी या परिसराचे दृढ संबंध होते. महानुभावपंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी, सिद्धयोगी चांगा वटेश्वर आणि त्यांची गुरू, गोरक्षनाथशिष्या योगिनी मुक्ताबाई यांचीही साधना श्रीपर्वताशी निगडित होती. एकूणच महाराष्ट्राच्या शैव विचारधारांवर श्रीपर्वताचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष पण अत्यंत गाढ परिणाम आहे. इथल्या शिवोपासनेला आणि शैव साहित्याला भारतीय पातळीवरच्या विविधांगी शिवोपासनेशी जोडून देणार्या श्रीपर्वताच्या छायेत महाराष्ट्रातल्या धार्मिक-सांस्कृतिक इतिहासातले काही महत्त्वाचे दुवे या ग्रंथात नव्याने उलगडले आहेत आणि काही कूट रहस्यांवरही नवा प्रकाश टाकला आहे.