श्री संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील अलौकिक विभूतिमत्त्व होते. सामान्य कुळात जन्मलेल्या या पुरुषाने आपल्या अनुभूतीतून अंत:करणाची केवढी उंची गाठली हे पाहिले म्हणजे अंत:करण आश्चर्यमूढ होते. त्यांचे सर्व कर्तृत्व त्यांच्या जीवनातून साकारलेले आहे. गाडगेबाबांचा आदर्श आजच्या स्वार्थाने बरबटलेल्या समाजाला उत्तम मार्गदर्शक असे आहे. इतके त्यागमय, नि:स्वार्थ, सेवाभावी जीवन सापडणे दुर्मिळ अशा या अलौकिक महापुरुषाच्या जीवनाने वाचकांच्या मनात नवीन प्रेरणा उत्पन्न होईल व आपले एक जीवन उत्पन्न करण्याची स्फूर्ती त्यांना मिळेल, हाच चरित्रग्रंथाचा मुख्य हेतू आहे.