मराठी आणि कन्नड या दोन्हींचे भाषा म्हणून अस्तित्व वेगळे असले, तरी या दोन्ही संस्कृतीमध्ये असणारे सख्य हे या दोन्ही भाषांतील वाङ्मयाविष्कारातून अनोख्या स्वरूपात प्रत्ययाला येते. नाटक आणि रंगभूमीच्या संदर्भात तर ही गोष्ट आणखी अधोरेखित होते. वेगवेगळ्या नाट्यरूपांच्या आविष्कारातून कन्नड मराठी संस्कृती-संगमाचे घडणारे दर्शन तर रसिकांच्या मनावर मोहिनी टाकणारे आहे. त्यामुळेच मराठी आणि कन्नडमधील अनेक ज्ञात-अज्ञात नाट्यरूपांचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी केला आहे. प्रस्तुत पुस्तकातील एकूण वीस लेखांतून महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही प्रदेशातील नाट्यरूपांचा शोध घेतानाच लेखकाने पारंपरिक समाजजीवनाची ओळख करून दिली आहे; ह्यामुळेच ह्या पुस्तकाची उपयुक्तता लोकसाहित्याच्या अभ्यासकांना आणि लोकसंस्कृतीचा परिचय करून घेणार्यांना उपयुक्त आहे.