‘श्रीविठ्ठला’ला प्रेम आणि भक्तिभावाने, कधी श्रद्धेने तर कधी परंपरेने विविध नावांनी ओळखले गेले आहे. त्या नावांतील ‘पांडुरंग’ हे एक प्रसिद्ध नाव आहे. पांडुरंग हे नाव कोठून आले असावे? या नावाबद्दल संप्रदायात आणि संप्रदायाबाहेर खूप जिज्ञासा आहे.
ह्यापूर्वी अनेक नामवंत अभ्यासकांनी, संशोधकांनी
आपले मत मांडले आहे. तर्क मांडले आहेत.
पांडुरंगाच्या शोधयात्रेत डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी
एकनाथ सदाशिव जोशी यांच्या ‘श्रीपूर माहात्म्य’
ह्या ग्रंथाच्या आधारे पांडुरंगाचा शोध घेण्याचा येथे प्रयत्न
केला आहे. ‘पांडुरंग’ नावाप्रमाणेच पांडुरंग क्षेत्राचा,
सरस्वती-चंद्रभागा क्षेत्राचा संशोधनात्मक वेध घेतला आहे.
ह्या ग्रंथामुळे श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील
अष्टवर्षीय गोपवेशातील ‘पांडुरंग’ आणि स्वतंत्र मंदिरात असलेल्या राधाभावी ‘श्रीलक्ष्मी’ यांवर कुतूहलपूर्ती करणारा प्रकाश पडला आहे. त्याचबरोबर श्रीबालाजी,
श्रीपांडुरंग आणि श्रीविठ्ठल असा श्रीविष्णूंचा कलियुगातील अवतार-प्रवासदेखील स्पष्ट केला आहे.