ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला काही प्रमाणात का होईना, शेतीबद्दल आत्मीयता असते. शेतीपिकाचे, मशागतीचे थोडेफार का होईना ज्ञान असते. स्वत:च्या गावाबद्दल आस्था असते. अर्थात, लहानपणापासूनच त्याला शेती, गरिबी, रोजगार, निसर्ग तसेच गावाच्या समस्या आदींचे बाळकडू सहजपणे पाजले जाते. असे बाळकडू प्यायलेला तरुण कुटुंबाच्या व गावाच्या विकासासाठी निश्चितच आत्मीयतेने पुढाकार घेऊन राष्ट्राच्या विकासात भर घालण्यासाठी आनंदाने पाऊल उचलेल यात शंका नाही. याच विचाराने शासनाच्या योजना त्याच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी राबविण्याकरिता शासकीय यंत्रणेबरोबर त्याची मदत घेण्याचे ठरवण्यात आले.मात्र केवळ असे ठरवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकतर्फी निर्देश देणे योग्य नसल्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी या विषयावर चर्चा करून त्यांचे मत जाणून घेण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने या कामी पुढाकार घेण्याचे बोलून दाखवले. विद्यार्थ्यांचा हा सकारात्मक प्रतिसाद विचारात घेऊन गरजू लोकांच्या आत्मनिर्भरतेसाठी म्हणजेच, सर्वांना लोकशाहीची खऱ्या अर्थाने अनुभूती मिळवून देण्यासाठी ‘कॉलेज-नॉलेज-व्हिलेज’ हा उपक्रम आनंदाने व आत्मविश्वासाने हाती घेण्यात आला. प्रस्तुत पुस्तकात या प्रकल्पाची सविस्तर व अगदी साध्या सरळ भाषेत मांडणी करण्यात आली आहे.