महाराजा सयाजीराव गायकवाड यांची साहित्य, कला आणि संस्कृतीविषयक निवडक भाषणे या दुसऱ्या खंडात संपादित केली आहेत. कला-संस्कृतीच्या विविध आविष्कारांतून समाजाची जीवनमूल्ये, सौंदर्यमूल्ये आणि जीवनादर्श एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकड़े संक्रमित होत असतात याचे डोळस भान असलेला हा राजा होता. आदर्श विचारांचा, सामाजिक सलोख्याचा आणि शाश्वत आनंदाचा शोध हे सयाजीरावांच्या जीवनप्रवासाचे मध्यवर्ती सूत्र होते. त्यामुळेच महाराजांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत प्राच्यविद्या संशोधन, अभिजात संस्कृत व इंग्रजी ग्रंथांची भाषांतरे, संगीत-चित्रादी ललित कलांचे संवर्धन आणि ग्रंथप्रसाराला विशेष प्राधान्य दिले.कला आणि विज्ञानाचा विकास हे माणसाचा वैचारिक पंगूपणा दूर करण्याचे मोठे शस्त्र आहे, या व्हॉल्टेअरच्या भूमिकेशी जुळणारी त्यांची विचारधारा होती. माणसाच्या जीवनातील आनंदाचा निर्देशांक वाढविण्यासाठी संगीत-नृत्यादी कलांचा रसास्वाद कसा महत्त्वाचा असतो, विवेकनिष्ठ समाजधारणेत ग्रंथप्रकाशन आणि ग्रंथप्रसार यांचा वाटा काय असतो आणि भौतिक समृद्धीची फळे चाखण्यासाठी विज्ञाननिष्ठेची कास का धरायला हवी याचे अत्यंत रसाळ व सुबोध दिग्दर्शन हे या भाषणांचे वैशिष्ट्य आहे. आजच्या संस्कृती संक्रमणाच्या काळात उथळ भोगवादी मूल्यांच्या आकर्षक भुलभुलैयापासून वाचायचे असेल तर अशा भाषणसंग्रहाची गावोगाव पारायणे व्हायला हवीत.– डॉ. रमेश वरखेडे