थोर लेखक-संपादक कॆ.वि.स.वाळिंबे यांच्या सुविद्य पत्नी विनिता वाळिंबे यांचे हे छोटेखानी आत्मकथन. बार्शीची इंदू दिगंबर केसकर पुण्याची विनिता विनायक वाळिंबे झाली; इथपासून ते पती वि.स.वळिंबे यांच्या निधनापर्यंतचा हा एका मध्यमवर्गीय गृहिणीने लिहिलेला प्रवास प्रांजळ, मनोज्ञ उतरला आहे. या आत्मपर लेखनाचा मुख्य भर वाळिंबे यांच्याबरोबरचं सहजीवन यावर आहे. त्यामुळे वि.स.वाळिंबे ह्या समर्थ लेखकाचे इतरही अनेक ठळक पॆलू कुठल्याही अभिनिवेशाशिवाय वाचकांसमोर येतात. चित्रपट, पत्रकारिता आणि पूर्णवेळ लेखन या तीनही प्रसिध्दीशी निगडित असलेल्या क्षेत्रांत वाळिंब्यांनी यशस्वी संचार केला. साहजिकच तत्कालीन अनेक मोठमोठ्या प्रतिभावंतांशी त्यांचा परिचय, स्नेह होता. कारणपरत्वे अशा अनेकांचं त्यांच्याकडे येणंजाणं असायचं. लेखिकेने अशा दिग्गजांच्या आठवणी अतिशय सहजसुंदर भाषेत इथे सांगितल्या आहेत. म्हणूनच या ‘साठवणीतल्या आठवणी’ वाचकांच्याही आठवणीत दीर्घकाळ राहतील.