ठाण्यातली गार्डन इस्टेट. तो तलाव. ते आंब्याचे झाड. तिथला पार अन् या पारावर सकाळ-संध्याकाळ स्मरणसाखळीत रमलेली सुखवस्तू ‘पथिक ग्रुप’ची सालस मंडळी. तिथले त्यांचे रंगलेले वाचन, श्लोकपठण, मंत्रोच्चारांचा मंदसा जयघोष. ज्ञानेश्वरीबरोबरच रवींद्रनाथांच्या संगीताबद्दल,गाण्याबद्दलचे चिंतन, मनन, गीतेतील श्लोकांचे उच्चारण आणि मग विलक्षण शांततेतील मौन. हे सारेच वातावरण मंत्रमुग्ध करणारे. या सहज मंतरलेल्या क्षणांचे, अनुभवांचे लेखक साक्षीदार. त्यांनी तिथे जी माणसं सजग दृष्टीने अनुभवली, जी काळजाच्या कुपीत साठवली, वैचित्र्याने खोल खोल अंत:करणात भिनत गेली, एक भावबंध निर्माण झाला आणि तीच सोयरी झाली. त्यांचाच रूपबंध म्हणजे ही अक्षरे. भोगलेल्या आयुष्याच्या पटावरील ऊन-पाऊस, छायाप्रकाश, सोनसळीतली आलेली तृप्तता अन् कातर सांजेच्या वेळची एक अनाम हुरहूर, वेधून टाकणारे स्मरणगंध यामुळे हे लेखन ओढ लावत राहाते.