‘संजीवन’ ही विख्यात लेखक भा. द. खेर यांची ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारलेली भावरम्य कादंबरी आहे. वारकरी सांप्रदायाने संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांना ‘माउली’ हे वात्सल्यपूर्ण नामाभिधान दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांवर अनेक विद्वान साहित्यिकांनी विविध प्रकारची ग्रंथनिर्मिती केली आहे. संस्कृत भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’ प्रत्येक भाविकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्ञानेश्वर हा प्रत्यक्ष विष्णूने लोककल्याणासाठी घेतलेला अवतार आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चिकित्सक संतसाहित्यिकांनी ‘ज्ञानेश्वरी’चा अन्वयार्थ विशद करणारे भाष्यग्रंथ लिहिले आहेत. भा. द. खेर त्यांच्या ‘संजीवन’ कादंबरीत विठ्ठलपंत-रुक्मिणी (ज्ञानेश्वरांचे मातापिता) यांच्या विवाहापासून ते ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीपर्यंतचे घटना-प्रसंग रसाळ भाषेत वर्णिले आहेत. खेर यांची लेखनशैली साधीसोपी पण लालित्यपूर्ण असल्यामुळे आपसूकपणे वाचनात तन्मयता येते. कादंबरीतील भावोत्कट करुण प्रसंगात आपण (वाचक) भारावून जातो. परमेश्वरानं मानवदेह धारण करून अवतारकार्य संपल्यावर आत्मरूपात विलीन व्हावं, तसा ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधिसोहळा तर कादंबरीतील उत्कर्षबिंदूच आहे.