वा.वा.गोखले हे भारतीय संगीताचे एक मर्मज्ञ रसिक होते. संगीतक्षेत्रात ‘वा.वा.’ या त्यांच्या आद्याक्षरांनीच ते ओळखले जात. स्वत: ‘वा.वा.’ एक चांगले हार्मोनियम-वादक होते. नामवंत गायकांना त्यांनी हार्मोनियमची साथही केली होती. संगीताची मनोमन आवड असल्याने अनेक गायकांशी व वादकांशी त्यांचे सहजपणे स्नेहबंध जुळले होते. रसिकता आणि स्नेहाचा ओलावा यामुळे त्यांनी रेखाटलेली कलावंतांची व्यक्तिचित्रे हृद्य झालेली आहेत. गायक किंवा वादकांच्या व्यक्तित्वाबरोबरच त्यांच्या मैफलींचेही एक जिवंत आणि प्रत्ययकारी चित्रण ते करू शकलेले आहेत. छोटूबुवा गोखले, माणिक वर्मा, जितेंद्र अभिषेकी, जी.एन.जोशी, शिवकुमार शर्मा, प्रभा अत्रे, भास्कर चंदावरकर, राम मराठे इत्यादी नव्या जुन्यांच्या गायन कलेचा ‘वा.वा.’नी घेतलेला वेध मनोज्ञ आहे.