पंडित ना. द. कशाळकर (१९०६ ते २००२) पं. ना. द. कशाळकर हे संगीत क्षेत्रात विचारवंत म्हणून सर्वांना परिचित आहेत. व्यवसायाने ते वकील होते; परंतु संगीताचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. बालपणी संगीताचे धडे त्यांनी सातार्याला मंटगेबुवा यांच्याकडे गिरवले. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी बालगंधर्वांची अनेक नाटके पाहिली व नाट्यसंगीताचा चोखंदळपणे अभ्यास केला. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावी त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला आणि संगीताचा अभ्यास वाढवला. ‘कशाळकर संगीत भवन’ हे संगीत विद्यालय सुरू केले. गाणे शिकताना त्यांनी लहान मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास केला. अनेक देशातील संगीत शिक्षणाचा अभ्यास केला. त्याच्या चिंतनातून‘गांधर्वशिक्षा’ हा ग्रंथ त्यांनी १९६४ साली लिहिला. त्याची सुधारित आवृत्ती ‘संगीत शिक्षणाच्या विविध पद्धती’ म्हणून आता प्रकाशित होत आहे. ‘बाल ज्ञानेश्वरी’, ‘सुबोध पातंजल’ हे त्यांचे आध्यात्मिक विषयांवरील ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी संगीत विषयक विपुल लेखन केले आहे.