गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ रोजी इंदूर येथे झाला. ह्या गोष्टीला आता एकशे दहा वर्षे पूर्ण झाली. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे ‘संगीत शारदा’ या नाटकाचा सुमारे एकशे दहा वर्षांतील टीकेचा समग्र अभ्यास आहे. देवलांनी ‘संगीत शारदा’ हे नाटक का लिहिले? समीक्षकांनी त्या संबंधी वेळोवेळी काय म्हटले, याचा समग्र अभ्यास हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. ‘संगीत शारदा’ या नाटकावर सर्वाधिक आणि सातत्याने समीक्षा होत असल्याने ‘ही मूल्यगर्भ कलाकृती’ आहे असे डॉ. अंजली जोशी म्हणतात. या सर्व अभ्यासाचा, मत-मतांतराचा सापेक्ष परामर्श अत्यंत सुबोध रीतीने, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता मुद्देसूद पद्धतीने, नेमकेपणाने या ग्रंथात आलेला आहे. हे सर्व लेखन सखोल विचार आणि चिकित्सक दृष्टीने केलेले असल्याने वाचनीय झाले आहे. या सर्व अभ्यासाचा निष्कर्ष म्हणजे ‘संगीत शारदा’ हे १८९९ सालचे नाटक, ‘एक वाङ्मयीन घटना’ आहे, हा आहे.