मानवी मनाशी असलेल्या अर्थपूर्ण नात्यातून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची कथा फुलत जात असल्याने ती अनुकरणमुक्त आहे. व्यक्तिगत मूल्यांचा आग्रह आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या या लेखकाला म्हणूनच जीवनाचे खरे आकलन झालेले आहे.
अज्ञान, दारिद्य्र आणि दु:ख यांमुळे पांगळ्या बनत चाललेल्या मानवी मनाचे खरेखुरे चित्रण ‘कर्फ्यू आणि इतर कथा’ व ‘काफिला’ या कथासंग्रहांतील लेखनात दिसते. वास्तववादाशी नाते जोडत असताना आत्मभान ठेवावे लागते याचा हल्ली सर्वांनाच विसर पडलेला दिसतो. तसा विसर ‘संदर्भ’मध्ये कोत्तापल्ले यांना पडलेला नाही. सामाजिक, राजकीय, आर्थिक व धार्मिक क्षेत्रांतील दांभिकतेबद्दल असलेला विलक्षण संताप लेखणीतून ठिबकलेलाही दिसतो. काहीशी उत्कट व संवेदनागर्भ बनलेली त्यांची कथा ‘संदर्भ’मध्ये दिसते. म्हणूनच त्यांचा हा प्रवास मराठी कथावाङ्मयाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.