खोल आणि गंभीर संवेदना असलेली ललिता गादगे यांची कविता जीवनानुभवाबरोबर आत्मशोध घेत जाते. कवयित्रीचा स्वतःशी चाललेला आत्मसंवाद व त्यातून तिला आलेली अंतर्मुखता कवितेला अभिजात व चिंतनशील बनवत जाते. स्त्रीच्या आयुष्यात तिच्या समर्पित वृत्तीतून,भोवतीच्या नातेसंबंधातील ताणतणावातून येणारे दौर्बल्य, परंपरेने व संस्काराने लादलेली ओझी झुगारून नव्याने जाग्या झालेल्या व काही करू पाहणार्या आत्मभानाच्या हाकेला प्रतिसाद देता न येण्याच्या असहाय्यतेतून येणारं हताशपण यांना 'संवेदन' हा त्यांचा काव्यसंग्रह हळूवार स्पर्श करतो. स्त्री जीवनातील हे अनुभवक्षेत्रच तिच्या अस्तित्त्वाचा शोध घेत जाते. कविता आपसूक व्हावी लागते. त्यासाठी आवश्यक असणारी प्रतिभा व शैली गादगे यांना लाभली आहे, याची प्रचिती ह्या काव्यसंग्रहात येते.