डॉ. सुहासिनी इर्लेकर हे अध्ययन आणि अध्यापन क्षेत्रातील सुपरिचित नाव. याबरोबरच त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली. काव्य, समीक्षा,संशोधन, ललितलेखन, स्फुट आणि अस्फुटलेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी अतिशय दर्जेदार लेखन केले आहे. त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा हा प्रचंड आवाका एखाद्या ग्रंथात घेणे अशक्य आहे, हा त्यांच्या लेखनवैविध्याचा केवळ परिचयच नाही; तर त्याचे वाङ्मयीन महत्त्व वाचकांना व अभ्यासकांना समजावे ह्या हेतूने हा ग्रंथ सिद्ध झाला आहे.
डॉ. सुहासिनी इर्लेकर यांच्या साहित्यावर वेळोवेळी मान्यवर समीक्षकांनी, साहित्यकारांनी लिहिले आहे. काहींनी नव्याने लेख लिहिले आहेत. ह्या सर्व लेखांतून डॉ. सुहासिनी इर्लेकर यांची वाङ्मयीन गुणवत्ता स्पष्ट होते. मराठवाड्यातील त्या पहिल्या महिला मान्यवर संशोधिका आणि कवयित्री म्हणून मराठवाड्याला त्यांचे महत्त्व अधिक आहे. परंतु आपल्या सृजनशील व संशोधनात्मक लेखनांतून त्यांचे संपूर्ण मराठी साहित्याला असलेले योगदान मोठे आहे, ते विसरता येणार नाही. हा ग्रंथ ह्याची प्रचीती देतो. डॉ. इर्लेकर यांच्या वाचकांना व अभ्यासकांनाच नव्हे, तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा साठ वर्षांचा वाङ्मयीन काळ समजून घ्यायलाही हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.