‘समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी’ या ग्रंथात डॉ. नंदकुमार मोरे यांनी केलेले कादंबरीवाङ्मयाचे अभिनव अध्ययन दृष्टोत्पत्तीस येते. कादंबरी हा वाङ्मयप्रकार मानवी जगण्याला सामाजिक संदर्भात व्यामिश्रतेने आविष्कृत करणारा प्रकार आहे. साहित्याचे माध्यम भाषा असते. भाषा ही सामाजिक संस्था आहे. भाषेचा सामाजिक संदर्भात विचार करणारी भाषाविज्ञानातील ज्ञानशाखा म्हणजे समाजभाषाविज्ञान. यामुळे कादंबरीचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास हा अनेकांगांनी कादंबरीचे नेटके वाचन करायला उपयुक्त ठरतो. कादंबरीचा करार हा कथन या आविष्कारमाध्यमाशी असल्यामुळे कथनरीतीचा भाषिक वेध हा फारच उद्बोधक व मनोरंजक ठरतो. त्यात पुन्हा कादंबरीतील सामाजिक-सांस्कृतिक सूक्ष्म ह्या गोष्टी कथनाचा जर सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात विचार झाला तरच कळू शकतात. यामुळे कादंबरीतील वातावरण,उपहास, उपरोध, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ इत्यादींचे आकलन यथार्थ होते. परिणामत: कादंबरीकाराचे तत्त्वज्ञानात्मक चिंतनही सखोलपणे आकळायला मदत होते. कुठल्याही साहित्यप्रकाराच्या सर्वांगीण शक्ती ह्या भाषेच्या सूक्ष्म चिकित्सेद्वाराच कळू शकतात. याचे उत्तम प्रात्यक्षिक प्रस्तुत ग्रंथात दिसते. या ग्रंथाच्या निमित्ताने डॉ. नंदकुमार मोरे यांनी अभ्यासाचे एक नवे प्रतिमान घडविले आहे. यासाठी जिज्ञासूंनी हा ग्रंथ वाचायलाच हवा.
- डॉ. दिलीप धोंडगे