ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर यांनी मराठी साहित्य व समीक्षेला भारतीय पातळीवर प्रस्थापित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. अनुवाद रूपानेही त्यांनी मराठी साहित्य भारतीय पातळीवर पोचविलेले आहेच. त्यामुळे त्यांच्या साहित्य समीक्षेला आपोआपच एक वेगळे परिमाण प्राप्त झालेले आहे. प्रस्तुत समीक्षा संग्रहदेखील याचीच साक्ष देईल.
कादंबरीची समीक्षा हा डॉ. बांदिवडेकर यांचा खास चिंतनाचा विषय आहे. या संग्रहातील कादंबरीविषयक लेखांवरून असे दिसेल की, ते कादंबरीचा विचार एका व्यापक पृष्ठप्रदेशावर करतात.
कथा व अन्य साहित्यप्रकारांबाबत लिहितानाही ते एकाच वेळी सूक्ष्मदर्शी आणि समग्रदर्शी समीक्षाव्यूहांचे उपयोजन करतात. प्रस्तुत पुस्तकात डॉ. बांदिवडेकरांनी भारतीय मनाचे स्वरूप, कादंबरी रूपाकाराचे स्वरूप, कादंबरीचे मर्म, श्रेष्ठ साहित्याचे निकष, साहित्यकृतींचा तरतमभाव, साहित्यावर पडलेले अनेक प्रभाव, साहित्याच्या उणिवा इत्यादी प्रश्नांची विस्तृत अशी समीक्षात्मक चर्चा केलेली आहे. तसेच साहित्याची शक्ती आणि सीमांची जाणीव स्पष्ट केली आहे. यांमुळेच वाङ्मय रसिकाची व अभ्यासकांची आकलनशक्ती सशक्त करणारा हा ग्रंथ मराठीतील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे यात शंका नाही.