‘रेषा आणि रंग’ या श्री. वि. स. खांडेकरांच्या नव्या ग्रंथात अठरा टीकालेखांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. रसिक, मर्मज्ञ व समतोल टीकाकार हा वाङ्मयीन प्रगतीचा एक महत्त्वाचा घटक असतो. साहित्यातल्या बऱ्यावाईटाची पारख कशी करावी, तिची कसोटी कोणती, चांगल्याचा आस्वाद कसा घ्यावा, हे हीन, क्षुद्र किंवा कलाहीन असेल,त्याची मूलगामी मीमांसा कशी करावी, हे सर्वसामान्य वाचकाला टीकाकाराखेरीज दुसरे कोण सांगणार ? डोळस साहित्यप्रेम.. नुसती रंजक वाचनाची चटक नव्हे.. हा समाजाच्या खऱ्याखुऱ्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पंडित असूनही रूक्ष नसलेले, चिकित्सक असूनही केवळ चिरफाडीत न रमणारे, नवीनाचे स्वागत करताना जुन्याचा वारसा न विसरणारे आणि भूतकाळाचा सुगंध घेता घेता भविष्याची स्वप्ने पाहणारे टीकाकार.. समीक्षक, समालोचक, रसग्रहण, मूल्यमापन, तत्त्वचिंतक असे सर्व प्रकारचे टीकाकार हे काम चांगल्या प्रकारे पाडू शकतात. श्री. खांडेकर हे याच पठडीतील सहृदय टीकाकार आहेत, अशी खात्री अभ्यासकांना वाटेल, अशी हमी हा टीकालेखांचा संग्रह देत आहे.