गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या लेखणीतून साकारलेल्या विविध कथांची गुंफण म्हणजे हा कथासंग्रह.या कथांमधील बव्हंशी मुख्य पात्रे ही किशोर व कुमारवयातील आहेत. त्यांचे स्वभाव, कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीचा त्यांच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांचे चित्रण या कथांमध्ये उमटते. बाह्य घटनांप्रमाणेच अंतरंगातील भावनिक आंदोलनांचे विश्लेषण करण्याचे विलक्षण सामर्थ्य गुरुदेवांच्या लेखणीत आहे. त्यामुळे वाचक भावनिकरीत्या या कथांशी स्वानुभवांनी जोडला जातो.मानवी स्वभाव, तत्कालीन समाजव्यवस्था व शिक्षणपद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या या सर्व कथा मुग्ध करणाऱ्या आहेत. थेटपणे कोणताही उपदेश न करता अप्रत्यक्षपणे मूल्यात्मक संदेश देणाऱ्या या कथा सर्व वयोगटातील वाचकांना चिंतन व आत्मनिरीक्षणास प्रवृत्त करणाऱ्या आहेत. मुलांना समजून घेण्यासाठी मोठ्यांसाठीही या कथा वाचनीय ठरतील.