रात्र, दु:ख आणि कविता’ या अंजली कुलकर्णी यांच्या चौथ्या संग्रहातील कवितांमध्ये जाणीव-नेणिवेच्या काठावरचा प्रदेश धुंडाळण्याचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या अनुभवांच्या वाटा चालून जाण्याचे धाडस आणि कुतूहल त्यांच्यापाशी आहे. मनातल्या भावस्पंदनांना अनुरूप अशी अभिव्यक्तीही त्यांच्यापाशी आहे. त्यांच्या कवितेला आत्मसंवादातून आलेली स्वगताची लय असून ती लय कवितेला चिंतनाचे परिमाण देते. या संग्रहातील कविता तीन वेगवेगळ्या गटांत विभागल्या असल्या तरी त्यात केंद्रवर्ती सूत्र एक आहे, हे जाणवते. ते सूत्र आहे निर्मितितत्त्व. रात्र ही कवयित्रीसाठी आदिम शृंगाराची प्रतिमा आहे. दु:ख हे निर्मितीच्या वेणांचे व्यक्त रूप आहे आणि कविता हे तिच्या सर्जनशील जगण्यातील श्रेयस आहे. हे तीनही अनुभवघटक कवयित्रीने एका अनावर आवेगातून आणि कलात्मक संयमातून शब्दबद्ध केले आहेत. यातील संवेद्य प्रतिमांमुळे या कवितांना आगळीच झळाळी आली आहे. स्वत:च्या अंतर्मनाचा थांग लावण्याचा कवयित्रीचा हा प्रयत्न तिच्यातील कलावंताला निश्चितच समृद्ध करणारा आहे.
- डॉ. नीलिमा गुंडी