राष्ट्र आणि राष्ट्रवाद या संकल्पनांचे संपूर्ण आकलन होण्यासाठी केवळ राज्यशास्त्रीय संदर्भ सांगणे पुरेसे नाही याची जाणीव डॉ. सुधाकर देशमुख
यांना असल्यामुळे जगामध्ये जे जे वैचारिक मंथन आजपर्यंत झाले, ह्यामधील जीवनाच्या विविध क्षेत्रांतील विचारधारांचा मागोवा त्यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे स्थलांतर, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विविध विषयांचा सखोल अभ्यास करून डॉ. देशमुख यांनी राष्ट्र आणि राष्ट्रवादाची संकल्पना विषद केली आहे. गेल्या दोनशे वर्षांत ही संकल्पना कशी बदलत व विकसित होत गेली याची मांडणी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेली आहे. मानवतावाद हे उच्च प्रतीचे ध्येय आहे. त्याकरिता राष्ट्रनिष्ठ मानवता आणि मानवतानिष्ठ राष्ट्रीयत्व या दोन मनोवृत्तींच्या विकासाची गरज आहे; हे या विद्वत्तापूर्ण आणि ध्येयवादी भूमिकेतून लिहिलेल्या ग्रंथाचे भरतवाक्य आहे.