मराठी साहित्यातील अलौकिक प्रतिमेचे कवी, नाटककार आणि विनोदकार कै. राम गणेश गडकरी यांच्या जीवनपटाच्या पाश्वभूमीवर श्री. वि. स. खांडेकरांनी चितारलेले हे वाड्मयात्मक; परंतु यथार्थ व्यक्तिचित्र आहे. हा मूळ ग्रंथ कै. गडक-यांच्या मृत्यूनंतर सुमारे बारा वर्षांनी १९३२ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाला. त्याची सुधारित आवृत्ती १९४७ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर ५० वर्षांनी, १९९७ मध्ये तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि आता या पुस्तकाचे पुनःमुद्रण होत आहे. मराठी नाट्यसृष्टीच्या जन्मकाळापासूनच्या पुढील पन्नास वर्षातील सर्व प्रमुख नाट्यप्रवाहाचा संगम कै. गडाक-यांच्या नाटकात झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या नाटकांचा मार्मिक व चिकित्सक दृष्टीने अभ्यास होणे आवश्यक होते. या अभ्यासाचे फलस्वरूप `गडकरी व्यक्ती आणि वाड्मय` या पुस्तकाच्या रूपाने श्री. खांडेकरांनी चोखंदळ वाचकांपुढे ठेवले आहे. कै.गडकरांच्या मृत्यूला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण होत आली असली तरी, त्यांच्या नाटकाची लोकप्रियता अबाधित आहे. मराठी नाट्यकलेच्या पुनर्जीवनाच्या दृष्टीने विविध प्रयोग आज सुरु आहेत. कै. गडक-याणसारख्या प्रभावशिल नाटककारांचा हा चिकित्सक अभ्यास या कामासाठी फार महत्वाचे साधन ठरणार आहे.