लग्नापूर्वी खेळकर, थोडीशी बेफिकिर असणारी राधा रेगे लग्नानंतर आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल जागरुक झाली. दोन मुलांच्या जन्मानंतर तर त्यांचे संगोपन व उत्तम मानसिक संस्कार या कात्रीत ती सापडली. तिचा नवरा हरीहर ; कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा होता. पण मुलांच्या आर्थिक व मानसिक प्रगतीकरतां राधालाच झगडावे लागले. पानशेतच्या पुरांत कुटुंब सोडून तिचे सर्वस्व वाहून गेले. नंतर कांही दिवस तिने केलेली धडपड फक्त त्या दिवसाकरीता होती. त्यांत तिला उद्या दिसत नव्हता. त्याच पानशेतच्या पुरांत दोन चिमण्या जीवांना व त्यांच्या आईला वाचविल्यानंतर मधुकर कडला आयुष्याचा खरा अर्थ कळला. देवयोगाने ही दोन्ही कुटुंबे शेजारीशेजारी राहण्यास आली. त्यानंतर राधाला जीवनाची नवी दिशा गवसली आणि आपल्या मुलांच्या उत्कर्षाकरतां तिला जे करायचे होते त्याची वाटचालच सुरु झाली.