शालेय परीक्षांमध्ये मिळणारी उच्च गुणवत्ता आयुष्याला तोंड देण्यासाठी पुरेशी नसते. जोपर्यंत विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही तोपर्यंत विद्यार्थी आयुष्यातील आव्हानं स्वीकारण्यास पात्र होत नाही.व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक पद्धतींमध्ये वक्तृत्व कला ही फार उच्च दर्जाची पद्धत आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये मानली जाते.सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारशक्तीला वळण लावण्याचं जे सामर्थ्य आपण मिळवतो ते शब्दांच्या पलीकडलं आहे.तो आनंद, ते सामर्थ्य हे प्रत्येक वक्त्या विद्यार्थ्याला स्वतःला अनुभवता येतं.कारण ही शक्ती हे सामर्थ्य प्रत्येकामध्ये असते आणि त्याचा विकास करण्यासाठी अशा वक्तृत्व स्पर्धांचा उपयोग करून घ्यायचा असतो. म्हणूनच या पुस्तकात प्रथम क्रमांकाची निवडक भाषणे दिली आहेत.दिलेल्या भाषणांचे विषय जसेच्या तसे येतीलच असे नाही. त्यातून जर आज विषय आलेच तर नवीन संदर्भ घेणे आवश्यक आहे.विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सुप्त शक्तीला चालना देण्यासाठी, वक्तृत्व फुलविण्यासाठी या भाषणांचा नक्कीच उपयोग होईल.