मराठी वाङ्मयातील प्राचीन व अर्वाचीन काळातल्या अंत:प्रवाहांमधल्या अनुबंधाचा शोध येथे आहे. साठोत्तरी मराठी अध्ययनक्षेत्रात ‘देशी’अनुबंधांच्या शोधाची प्रवृत्ती विशेष दिसते. पूर्वकालीन मराठी लेखकांनाही ह्या अनुबंधाचा विसर पडला नव्हता. बहिणाबाईंपासून शांताबाईंपर्यंतच्या आणि मर्ढेकरांपासून महानोरांपर्यंतच्या काव्यधारेने संतसाहित्य व लोकसाहित्य ह्यांच्याशी आपला अनुबंध मान्य केला. किर्लोस्कर ते तेंडुलकर व पुढे आळेकर, एलकुंचवारांपर्यंतच्या नाट्यधारेने जुन्या वाटेवर नवी पावले उमटविली. प्रायोगिक रंगभूमीने जुन्या लोककलांशी नाते जपले. संत-साहित्य, लोककला, लोकवाङ्मय व प्राचीन भारतीय साहित्यातून वाहत सर्व भारतीय भाषांत पसरलेला भारतीय धारणांचा प्रवाह, हे सर्व आजच्या मराठी साहित्यापर्यंत कसे वाहत आले आहेत ह्याचा साक्षेपी शोध म्हणजे हा ग्रंथ.
डॉ. म. शं. वाबगावकर यांच्या गौरवार्थ तयार केलेला प्राचीन-अर्वाचीन
साहित्यानुबंध हा लेखसंग्रह वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.